
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१ जुलै)
गडचिरोली शहरातील ‘संताजी भवन’ आरमोरी रोड गडचिरोली येथे संताजी सोशल मंडळ गडचिरोली तर्फे रविवार ३० जूनला तेली समाजातील स्टेट बोर्ड,व सि.बी.एस.सी, एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी, पी.एच.डी, एम.बि. बि.एस, नवोदय, स्कॉलरशिप उत्तीर्ण झालेल्या अश्या एकूण ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व पुष्पहार घालून तसेच स्वागत गीताने झाली.
यावेळी प्रमोदजी तरारे अध्यक्ष महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण खंडपीठ मुंबईचे न्यायिक सदस्य तथा माजी धर्मदाय आयुक्त हे त्यांचे वडील स्वर्गीय श्रावणजी तरारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या समाजातील जे विद्यार्थी गरीब, होतकरू, हुशार, आर्थिक दृष्ट्या कमकुवत, ज्याला समोर जाऊन स्वतःची प्रगती साधायची आहे व समाजाची सेवा करायची आहे परंतु आर्थिक अडचणींमुळे पुढे शिकु शकत नाही अशा तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श समाजापुढे ठेवला.
दुसरे समाजातील दाते आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाण ठेवून डी डी सोनटक्के यांनी मंडळाकडे आलेल्या बारावीच्या गुणपत्रिकांपैकी सायन्स ग्रुपमध्ये सर्वात जास्त मार्क्स प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला पंधराशे रुपयांचे पारितोषिक दिले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून अनिलजी बजाईत लेखक तथा कवी संस्थापक श्री संताजी अखिल भारतीय तेली समाज संघटन (म.रा.) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. रामदास कुनघाडकर, सचिव गोपीनाथ चांदेवार मा. संजय मेहर नागपूर शहर अध्यक्ष तेली समाज संघटन (म.रा.) हे होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेसह अध्यक्षीय भाषणात देवानंद कामडी म्हणाले की, आमचं मंडळ अराजकीय असून या मंडळाद्वारे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात व सामाजिक बांधिलकी जपली जाते.
मुख्य मार्गदर्शकाचे पदावरून बोलताना अनिलजी बजाईत म्हणाले की समाजकार्य म्हटलं की घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे होय, मी घर, कुटुंब, नोकरी सांभाळून समाजसेवेसाठी स्वतःला झोकून दिलेला आहे याकरिता माझे दोन इन्क्रिमेंट सुद्धा सरकारने थांबविलेले आहे तरी मी पर्वा केलेली नाही आणि समाजकार्य थांबविले नाही. समाज एकवटला पाहिजे समाजात फार मोठी ताकद आहे असे अलीकडच्या राजकारणातून आपणास दिसून येते. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेसह विविध क्षेत्रात आपले करीअर केले पाहिजे असेही आव्हान त्यांनी यावेळी केले. यावेळी इतर मान्यवरांचे सुद्धा मुलांच्या करिअर बाबत समयोचित विस्तृत असे मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाचे संचालन विठ्ठलराव कोठारे यांनी केले तर आभार प्रदर्श प्रतिभाताई आकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संताजी स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश भांडेकर, सुधाकर लाकडे, राजेंद्र भरडकर, प्रा. निवृत्ती शेंडे, प्रा. सुनील कांबडी, सुरेश निंबोरकर, महादेव वाघे, हेमंत खोब्रागडे, विष्णु कांबळे, चंद्रकांत किरमे, चंद्रकिशोर किरमे, बालाजी भुरले, लता कोलते, भावना निंबोरकर, जयश्री आंबोरकर, ममता चिलबुले, भारती खोब्रागडे, शालिनी कांबळे आदींनी सहकार्य केले.तेली समाजातील गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
