
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२५ डिसेंम्बर )
२४ डिसेंबरला धानोरा येथे, धानोरा तालुक्यातील ९ इलाक्यातील लोकं व प्रमुख आदिवासी नेते यांचे उपस्थितीत पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या या महोत्सवात पेसा कायदा, वनहक्क कायदा विषयावर चर्चा करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या मोहफुल दारू कारखान्याची परवागनी रद्द करण्याचा ठराव, सर्वानुमते चर्चा करून सर्व सहमतीने पारित करण्यात आला. या कार्यक्रमाला २०० गावातील गावांच्या ग्रामसभांचे अध्यक्ष, गावप्रमुख, पुजारी, भूम्या, जमीनदार, महिला व तरुण मंडळी मोठ्या संख्येने हजर होते. प्रामुख्याने जेष्ठ समाजसेवक तथा जिल्हा महाग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा, माजी आमदार तथा इलाका प्रमुख व समाजसेवक हिरामण वरखडे, अड.ताराम, दौलतशहा मडावी जमीनदार धानोरा इलाका, बाजीराव नरोटे महासंघ सचिव, नाजूकराव तोफा, गनू जांगी पुजारी, याठिकाणी हजर होते.
या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांनी ठरावावर सह्या केल्या. रद्द करा, रद्द करा मोहफुल कारखाना परवानगी रद्द करा ह्या घोषणा दोन्ही हात वर करून मोठ्या आवाजात जाहीररित्या याठिकाणी करण्यात आल्या.
दारू कारखाना रद्द करा, हा मुद्दा मांडताना देवाजी तोफा यांनी बोलतांना ताकीद देत, जबरदस्तीने जिल्ह्यात कारखाना झाल्यास यासाठी मोठे जनआंदोलन उभे राहील असा इशारा यावेळी दिला. दारूमुळे काय नुकसान होते हे शासनाने समजून घेतले पाहिजे, भांडणे होतात, पैसा संपतो, महिलांना मारहाण होते, शिस्त-सभ्यता राहत नाही, आरोग्यावर परिणाम होतो. लहान मुले, विद्यार्थी, कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी अनुकरण करून बिघडतील असे सुद्धा ते पुढे बोलतांना म्हणाले.
हिरामण वरखडे म्हणाले कि, सरकारने दारू कारखाना जिल्ह्यात करावा हे अभिशाप होईल, जिल्ह्यातील जनतेला उध्वस्त करण्याचे हे षड्यंत्र आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना होऊ देणार नाही, तो रद्द झाला पाहिजे. बोलतांना त्यांनी शासनाला विनंती केली कि मोहापासून अन्नपदार्थ तयार करावे, खाद्यपदार्थाचा कारखाना करा. कुपोषण ग्रस्त, गर्भवती बाया, ज्यांना अॅनिमिया आहे त्यांना सकस आहार मिळेल, म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन ते जगतील अशी व्यवस्था शासनाने केली पाहिजे. हा मुद्दा गांभीर्याने घेऊन कारखाना परवानगी रद्द करा असे ते यावेळी बोलले.कारखाना झाल्यास काय दुष्परिणाम होईल यावर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.
