स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी आक्रमक लढा उभारणार – महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्यकारणी बैठकीत निर्धार
लोकशाही न्युज,नांदेड (२२ जून)
तात्पुरत्या सुविधा देण्याचे आश्वासन न देता कायमस्वरूपी सेवा सुविधा पुरवणारी यंत्रणा तयार व्हावी याकरिता वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील सर्वच घटकांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तात्काळ गठीत करावे यासाठी आगामी काळात रस्त्यावर उतरुन आक्रमक आंदोलन उभारण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्यकारणी बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक नांदेड येथे संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, व्यवस्थापन समिती सदस्य संजय पावसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.
या बैठकीबाबत माहिती देताना श्री पाटणकर यांनी सांगितले गेली पंधरा ते सोळा वर्षे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीत करावे यासाठी आम्ही राज्य संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. राज्यातील सर्व आमदार, खासदार यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधींना याबाबतची निवेदने आम्ही अनेक वेळा दिली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आंदोलनेही केली आहेत. राज्यात भाजप सेना युतीचे सरकार असताना तत्कालीन कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आदेशानुसार स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्या साठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती. सहाय्यक कामगार आयुक्त,विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई या समितीच्या अध्यक्ष तर सरकारी कामगार अधिकारी विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई हे या समितीचे सचिव होते. या समितीने आपला अहवाल डिसेंबर २०१९ मध्ये सरकारला सादर केला आहे. मात्र अद्यापही याबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही.
संघटनेचे कार्याध्यक्ष श्री बालाजी पवार म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने मतांवर डोळा ठेवून समाजाच्या नावावर, जातीच्या नावावर महामंडळी दिली जात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्वतःच ही खंत अधिवेशनात मांडली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसारख्या कष्टकरी घटकाला स्वतंत्र कल्याणकारी मंडळ मिळावे ही आमची मागणी आहे व सरकारने ती पूर्ण करावी. यासाठी सरकारला कोणतीही आर्थिक बोजा लागणार नसून आर्थिक तरतुदीचे मार्गही अभ्यास समितीने सुचवले आहेत.
संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती कार्यकारणी समोर मांडली. वृत्तपत्र विक्रेत्यांचा व्यवसायाचे स्वरूप कामाची पद्धत याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ असणे गरजेचे आहे. शासनाच्या धोरणानुसार सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एकच कल्याणकारी मंडळ करण्यात येणार आहे मात्र असंघटित कामगार क्षेत्रातील कामगारांची प्रचंड मोठी संख्या व शासन पातळीवर त्यासाठी निधी ची तरतूद करण्याची उदासीनता पाहता वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यामधून सोईसवलती मिळतील याची खात्री वाटत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील कॉम्प्युटर ऑपरेटर, क्लार्क, शिपाई, वितरण प्रतिनिधी, जाहिरात प्रतिनिधी, ग्रामीण भागातील वार्ताहर, अंक पोहोचवणारे पायलट बॉय, वाहन चालक या सर्वांनाच या कल्याणकारी मंडळांमधून लाभ देण्यात यावा असे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीत करावे अशी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची मागणी आहे.
कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांनी सांगितले वाढती महागाई व वृत्तपत्र विक्रीतून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ घालताना वृत्तपत्र विक्रेत्यांना मोठी कसरत करावी लागते त्यामधून आपल्या मुलांचे चांगले शिक्षण स्वतःची घर आरोग्यावरील खर्च या गोष्टी वृत्तपत्र विक्रेता सक्षमपणे करू शकत नाही म्हणूनच कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांना आधार मिळणे गरजेचे आहे व त्याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे.
नांदेड येथे झालेल्या संघटनेच्या राज्य कार्यकारणी बैठकीच्या वेळी व्यवस्थापन समिती सदस्य संजय पावशे मुंबई,उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी मालेगाव नाशिक, दिनेश उके गोंदिया, अण्णासाहेब जगताप संभाजीनगर, संघटन सचिव विनोद पन्नासे चंद्रपूर, प्रकाश उन्हाळे शेगाव, मा.कोषाध्यक्ष गोरख भिलारे पंढरपूर, यांच्यासह प्रकाश आमले अकोट अकोला, रविंद्र चव्हाण यवतमाळ, प्रमोद भोयर गोंदिया, रमेश नागलकर नागपूर, बंडू मुळे वर्धा, माणिक चहांदे नागपूर, प्रकाश कुपेकर मुंबई, मनोज कटकुरी परभणी, किरण क्षिरसागर परभणी, चंद्रकांत घाटोळे नांदेड, राजेंद्र हलवाई हिंगोली, राजू गायकवाड मनोज कुदळे जगदीश उबरदंड तय्यब पठाण लातूर,रवींद्र कांबळे गडचिरोली आदी जिल्ह्यातील राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
राज्य कार्यकारिणीचे सदस्य चंद्रकांत घाटोळ नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे बाबू जलदेवार, गणेश वडगावकर,बालाजी चंदेल,संदिप कटकमवार,व्यंकटेश अनलदास,राजेश पवार, सत्यनारायण देवरकोंडा, चेतन चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या बैठकीचे उत्कृष्ट आयोजन केले.
