सामाजिक बहिष्कारा विरोधात लांडगे यांची न्यायालयात धाव,छगन शेडमाके यांचे पिडितास सहकार्य

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२२ जून)
तालुक्यातील पोटगाव गट ग्रामपंचायती अंतग॔त येत असलेल्या विठ्ठलगाव येथील अनुसूचित जातीच्या घनश्याम लांडगे यांच्या मालकीच्या जागेत संरक्षण भिंतीच्या बांधकामावरून उफाळून आलेल्या वादामुळे गावऱ्यांनी लांडगे यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकुन एकटे पाडले.गावात एकटे पडलेल्या लांडगेसी सर्वांनी फारकत घेतल्याने न्यायासाठी विवंचनेत असलेल्या लांडगेने अखेर गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके याच्या सहकार्याने अखेर सामाजिक बहिष्कारा विरोधात न्यायालयात धाव घेतली असुन दावा दाखल क्र. १२\२०२३ नुसार दिवाणी दावा दाखल केल्याने गावात चांगलीच खळबळ माजली आहे.
यात अन्य तिघांत पोटगाव गट ग्रामपंचायतीचे सरपंच, विठ्ठलगाव येथील सम्यक बौद्ध विहाराच्या अध्यक्षा रमा ब्रम्हदास सिंहगडे व बांधकाम कंञाटदार नितिन शंभरकर यांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील पोटगाव गट ग्रामपंचायती अंतग॔त येत असलेल्या विठ्ठलगाव येथील अनुसूचित जातीच्या घनश्याम लांडगे यांना १२ मार्च २०१० रोजी प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी भु.मा.क्र.-१४४ आराजी ०.०४ हे.आर.वनहक्क पट्ट्याने जागा दिली आहे. सदर जागेवर लांडगे यांचा वडीलोपार्जित कब्जा वहिवाट असल्याचे स्पष्ट असताना व सदर जागेत लांडगे कुटुंबासह वास्तव्यास असताना विहाराच्या बाजुने खुली असलेल्या जागेत लांडगे यांचा विरोध असताना शासकीय स्तरावरुन प्राप्त १० लाख रुपये निधीतुन संरक्षण भिंत बांधकाम सुरू करण्यात आले आहे,जे की बेकायदेशीर असुन शासन निधीचा अपव्यय आहे.

(अनुसूचित जातीचे पीडित घनश्याम लांडगे सह छगन शेडमाके)
दरम्यान गैरअर्जदार आमदार कृष्णा गजबे व गट ग्रामपंचायत पोटगाव यांची कोणतीही मालकी नसताना किंवा त्यांचे ताब्यात सदरची जागा नसताना लांडगे यांच्या मालकीच्या जागेत असलेले गोबरगॅसचे टाके तोडुन व अनाधिकृत अतिक्रमण करुन आमदार गजबे यांच्या सांगण्यावरून संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.यास जागा मालक लांडगे यांनी विरोध केला असता आमदार गजबे यांनी जागा मालकाला धमकावत बळजबरीने बांधकाम करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप करत त्यांच्याच सांगण्यावरून गैरअर्जदारांनी व गावातील सर्व लोकांनी मिळुन सामाजिक बहिष्कार टाकला आहे.यामुळे लांडगे यांना जीवन जगने कठिण झाले आहे.
आमदार हे जबाबदार व्यक्ती असुन शासनाच्या निधीचा कोठे व कसा वापर करायचा हे ज्ञात असतांना देखील आमदार गजबे यांनी पदाचा दुरुपयोग करून तसेच शासकीय निधीचा गैरवापर करून कार्यकर्त्याला खूश करण्यासाठी खेळी खेळली असुन त्यांच्या षडयंञाला गावकरी बळी पडुन सामाजिक बहिष्कार टाकला असल्याने लांडगे एकाकी पडले आहेत.लांडगे हे अनुसूचित जातीचे असुन द्रारीद्र्य रेषेखालील इसम आहेत.अशा स्थितीत त्यांना एकटे पाडण्यात आल्याने त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेडमाके यांनी प्रत्यक्ष मोका चौकशी करुन केलेल्या आरोपात तथ्य आढळून आल्याने अखेर सामाजिक बहिष्कारा विरोधात देसाईगंज न्यायालयात धाव घेतली असुन दावा दाखल क्र.१२\२०२३ नुसार चौघांविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे.यात बहिष्कार टाकण्यासाठी भाग पाडणाऱ्या व बळजबरीने बांधकाम करणारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत देसाईगंज न्यायालयात ३० जुन रोजी सुनावणी ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
