गडचिरोली जिल्ह्यावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे पत्रकार परिषदेतून आव्हान
गडचिरोली (दि,२६ नोव्हेंबर)
जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर प्रमाणात आहे. मात्र, नैसर्गिक संपत्ती नष्ट करून पैसे कमावू नका. आपला खनिकर्माला विरोध नाही. मात्र, गरीबांवर अन्याय होता कामा नये, गरीब माणूसच क्रांती करू शकतो, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाचे राज्यस्तरीय दोन दिवसीय शिबिर गडचिरोलीत आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे. पेसा अंतर्गत अधिकार कायम राहणे आवश्यक आहे. विविध विकासकामे घेण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. आदिवासींचे पांरपरिक व्यवसाय नष्ट करण्याचे काम करू नये. उद्योगांना आपला विरोध नसल्याचेही त्यांनी सांगितले. पेसामुळे ओबीसी व एससी प्रवर्गाला राजकीय आरक्षण मिळत नाही. तसेच कायद्यात तरतूद होत नाही. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कमी कालावधीचे असल्याने बोलायला मर्यादा येतात. घटनेने आम्हाला अधिकार दिले आहेत. त्यामुळे याविषयावर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करून मार्ग काढला जाईल. राज्यात सहकार वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून कचऱ्यापासून ब्रिकेट तयार करण्याबाबत विचार सुरू आहे. जिल्ह्यात भातपिकाच्या साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात गोडाऊन तयार करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर धान्य भिजू नये म्हणून विशेष उपाययोजना करण्यात यावी, अशीही मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली.
यावेळी पत्रकार परिषदेला प्रा. सदाशिव जाधव, चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, जिल्हाध्यक्ष रामदास जाराते, जयश्री वेळदा, संजय दुधबळे, दर्शना भोपये, अमोल मारकवार, कविता ठाकरे, अक्षय कोसनकर, हेमंत डोर्लीकर, श्यामसुंदर उराडे उपस्थित होते.
