गडचिरोली : जागतिक कर्करोग दिनानिमित्त सामान्य रुग्णालयात आरोग्य तपासणी व जनजागृती संपन्न

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ४ जानेवारी)
कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वेळीच निदान आणि उपचार झाल्यास त्यावर यशस्वीपणे मात करणे शक्य आहे. समाजात या आजाराबद्दल असलेली अनाठायी भीती दूर करून जनजागृती करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांनी केले.
जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आरोग्य तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी गुलाबी रिबन लावून जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “शरीरात कर्करोगाचे कोणतेही लक्षण आढळल्यास किंवा शंका आल्यास भीती न बाळगता त्वरित तज्ज्ञांकडून तपासणी व निदान करून घ्यावे. वेळेवर घेतलेला निर्णय जीव वाचवू शकतो.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी यावेळी सांगितले की, “कर्करोगाचे जर सुरुवातीच्या टप्प्यात (Early Detection) निदान झाले, तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे आपण रुग्णाला उत्तम आणि दर्जेदार जीवन देऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी तपासणीसाठी पुढे यावे.”
प्रमुख मार्गदर्शक बाह्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे यांनी कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.आरोग्य तपासणी व प्रबोधन
कार्यक्रमादरम्यान रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांवर विशेष भर देण्यात आला:
मौखिक कर्करोग (Oral Cancer)
स्तनाचा कर्करोग (Breast Cancer)
गर्भाशयाचा कर्करोग (Cervical Cancer)
या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. माधुरी कीलनाके, डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. मनीषा गेडाम, डॉ. चंद्रशेखर शानगोंडा,डॉ अमित साळवे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ. अनुपम मैशगौरी, डॉ. सरोज कुथे, डॉ. मृणाली रामटेके, डॉ. दिनेश रोकडे, मेट्रन आशा बावणे आणि मंजू मधू यांसह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल कंकनालवार, राहुल चावरे, संदीप मोटघरे, विजय सिडाम तसेच राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
