रिकाम्या घरातून विदेशी व मोहफुलाची दारू जप्त
पोलीस व मुक्तीपथ यांची संयुक्त कारवाई
गडचिरोली (दि,१५ जुलै)
स्थानिक इंदिरानगर येथील एका रिकाम्या घरावर धाड टाकून विदेशी व मोहफुलाची दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
शहरातील इंदिरा नगरात मागील काही वर्षांपासून अवैध दारुविक्री बंद होती. मात्र, काही नवीन विक्रेत्यांनी दारूचा व्यवसाय सुरू केला आहे. वॉर्डात जवळपास दहा दारूविक्रेते आहेत. यामुळे वार्डातील महिलांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एक विक्रेता रिकाम्या घरात दारू ठेवून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने सदर घरावर धाड टाकून तपासणी केली असता ,विदेशी दारूच्या 35 निपा व 20 लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल गडचिरोली पोलिसांनी जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे वार्डातील अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ही मोहीम पोलिस निरीक्षक अरविंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी धनराज चौधरी, परशुराम हलामी, सुजाता ठोंबरे, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी राबविली.
