जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

खरपुंडी वासीय झाले आक्रमक वादग्रस्त जागेवर काळे झेंडे दाखवून केला निषेध

आंदोलन तीव्र करण्याचा दिला प्रशासनाला इशारा

Spread the love

गडचिरोली, ता. १८ : खरपुंडी ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या जमिनीला अकृषक करण्यापूर्वीच या जमिनीवर प्लॉट पाडून विक्रीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे खरपुंडी येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी वादग्रस्त जमिनीवर काळे झेंडे घेऊन निषेध करत आंदोलन केले.
खरपुंडी येथील सव्र्हे क्रमांक ५० मधील आराजी २. १० हेक्टर जमिन अनेक वर्षांपासून उपयोगात घेतली नसतानाही सरकार जमा करण्यात आली नाही. त्यानंतर ही भोग वर्ग २ मधील जागा वर्ग १ करून त्यावर प्लॉट पाडण्यात आले. त्यानंतर येथे होर्डिंग लावून विक्रीसाठी जाहिरात करत प्लॉट विक्री सुरू करण्यात आली व त्यानंतर ग्रामस्थांनी ओरड केल्यावर जमिन अकृषक करण्यासाठी अर्ज करण्यात आला. उपविभागीय अधिकार्‍यांनी खरेतर आधीच प्लॉट पाडून विक्री का केली अशी विचारणा करत कारवाई करायला हवी होती. पण, त्यांनी अकृषकसाठी जाहीरनामा काढून १९ मेपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले. सध्या ही प्रक्रिया सुरू असतानाच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या वादग्रस्त जमिनीवर काळे झेंडे घेऊन जात आंदोलन केले. यावेळी आंदोलक म्हणाले की, खरपुंडी ता. जि. गडचिरोली येथील सर्वे क्रमांक ५० आराजी २. १० हेक्टर आर कृषक वर्ग १ निवासी प्रयोजनाकरिता अकृषक वापराची परवानगी मिळण्याबाबतचे नियम पाळण्यात आले नाही. या जमिनीचे भोगवटदार क्रमांक (१) वासुदेव जागोबा शेंडे रा. ता. जि. गडचिरोली व इतर १० तलाठी सातबारा नोंदप्रमाणे मालक आहेत. ही जमीन अनिल मधुकर धाईत आणि अश्विनी अनिल धाईत रा. पोस्ट तालुका जिल्हा गडचिरोली यांनी दहा लाख रुपयेप्रमाणे खरेदी केली आहे. ही जमीन १९५८-५९ मध्ये जागोबा शेंडे रा. गडचिरोली यांना कसून वहिवाट करण्याकरिता देण्यात आली होती. जागोबा शेंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार वासुदेव जागोबा शेंडे व इतर दहा यांची नावे सातबारावर चढविण्यात आली. ही जमीन पूर्वी वर्ग-२ ची होती. वर्ग २ ची जमीन दुसर्‍यांला विकता येत नाही म्हणून तहसीलदार गडचिरोली यांच्या कार्यालयात अनिल धाईत व अश्विनी धाईत यांनी ही जमिन वर्ग १ ची करवूनच जमीन खरेदी केली. ही कृषक जमीन विक्री खरेदी करताना नमुना सात-बारामध्ये नोंद केलेल्या भोगवटदारांपैकी काही हैदराबाद, नागपूर, खामगाव, देसाईगंज, गडचिरोली, आरमोरी, डोंगरगाव, भुसारी येथे वास्तव्याला राहणारे भोगवटादार यांना एकत्र आणून त्यांच्याकडून जमिनीवरील ताबासोड नोंद करण्यात आल्याच संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याशिवाय जमिनीच्या विक्रीच्या वेळी उपनिबंधक कार्यालयात ते हजरही नसावेत अशी शंका व्यक्त केली आहे. ही जमीन वर्ग २ ची असतानाच सपाटीकरण करून प्लॉट टाकण्यात आले. त्यानंतर कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून घाईघाईने ही जमीन वर्ग १ करण्यात आली. या परिसरातील बहुतांश जमिनी सरकार जमा करण्यात आल्या आहेत. पण, ही जमीन आजपर्यंत पडीकच असतानासुद्धा सरकार जमा करण्यात आली नाही. त्यामुळे ही जमीन सरकार जमा करून शासनाच्या इतर योजनांसाठी राखीव ठेवण्यात यावी किंवा ग्रामपंचायत कार्यालय तसेच शाळेच्या क्रिडांगणासह इतर विकासकामांसाठी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा…
या वादग्रस्त जागेच्या खरेदी-विक्रीसंदर्भात खरपुंडीतील नागरिकांमध्ये तीव्र रोष असूनही प्रशासन याची दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थ सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहे. मात्र, हा अन्याय व गैरकारभार असाच सुरू राहिल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. या आंदोलनात खरपुंडीचे उपसरपंच ऋषी नैताम, भगवान बुरांडे, जैराम दुमाने, मारोती मोटघरे, यमाजी नैताम, देवराव सातपुते, राकेश जुमनाके, चंद्रभान चलाख, लोमेश बुरांडे, राजेंद्र भुरसे, रामचंद्र गुरनुले, सचिन नैताम, राहुल नैताम, भाऊराव भुरसे, पीयूष भांडेकर, प्रदीप चलाख, सरकार व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button