गडचिरोली: दिड किलो वजनी स्तनकर्करोगाच्या ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया पार

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.७ नोव्हेंबर)
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि पुनरावृत्ती झालेला फिलोईड्स (Phyllodes) प्रकारातील स्तनकर्करोगाचा ट्यूमर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. ४५ वर्षीय महिला रुग्णाची शस्त्रक्रिया डॉ.अतिश बन्सोड, सहयोगी प्राध्यापक, शस्त्रक्रिया विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गेल्या ४ वर्षांपासून डाव्या स्तनात गाठ असल्याने तीव्र वेदना व त्रास सहन करत होती. या रुग्णाची यापूर्वी अहेरी येथे ६ वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया (लम्पेक्टॉमी) झाली होती, परंतु पुन्हा ट्यूमर वाढला. ती गडचिरोलीतील चार डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली, परंतु या केसमधील गुंतागुंत पाहता सर्वांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता.सविस्तर तपासणीत बायोप्सी अहवालानुसार फिलोईड्स ट्यूमर असल्याचे निदान झाले. पोटाच्या व छातीच्या सिटी स्कॅन तपासणीमध्ये इतर कोणताही विकार आढळला नाही. या वेळी ट्यूमरचा आकार ३०×३५ से.मी. आणि वजन तब्बल दिड किलो इतका होता.

(छायाचित्र – शस्त्रक्रिया पार करून दिड किलो वजनाचा ट्यूमर काढण्यात आला)
या यशस्वी शस्त्रक्रिये पथकात मुख्य शल्यचिकित्सक डॉ. अतिश बन्सोड, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख शल्यचिकित्साशास्त्र विभाग त्यांचे सहकारी डॉ. प्रसाद योगेंद्र बन्सोड, सहयोगी प्राध्यापक व वैद्यकीय अधीक्षक,डॉ. कृणाल चेंडकापुरे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अशना नागपाल,डॉ. पंकज कटारिया,डॉ. क्रिनल पारेख यांच सहभाग होते.तसेच या जटिल शस्त्रक्रिया मध्ये भूलतज्ज्ञ डॉ.साखरे व डॉ.मडावी यांचे मोलाचे योगदान ठरले. त्यासोबतच परिचारिका समीक्षा व ओ टी इन्चार्ज सिस्टर कविता नांदगाये यांचे महत्वपूर्ण सहकार्य ठरले.
या यशामागे डॉ. अविनाश टेकाडे, अधिष्ठाता, जीएमसी गडचिरोली, डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन). गडचिरोली यांचे सतत मार्गदर्शन लाभले. ऑपरेशन थिएटरमधील सर्व सहायक कर्मचारी व प्रशासनाचा सक्रिय सहभागही मोलाचा ठरला.
स्तन कर्करोगाच्या शस्त्रक्रिया गडचिरोलीतच पार पडणार
!!
या शस्त्रक्रियेमुळे गडचिरोली जिल्ह्यात कर्करोग उपचाराच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. आता गडचिरोलीतील नागरिकांना अशा गुंतागुंतीच्या आजारांसाठी नागपूर किंवा इतर शहरांत जाण्याची गरज भासणार नाही.
