श्री साई नामाच्या गजराने दुमदुमली गडचिरोली

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१५ ऑक्टोबर)
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी तथा श्री साई मंदिर, चामोर्शी रोड, गडचिरोली व श्री साई मंदिर, मार्केट लाईन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे आज श्री साई चर्मपादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गडचिरोली येथील कारगिल चौक येथे श्री साई पादुका रथाचे सकाळी ९ वाजता आगमन होताच श्री साई भक्तगणांनी मोठ्या उत्साहात व धार्मिक विधिवत पूजन करून स्वागत केले.यानंतर श्री साई चर्मपादुका पालखी ढोल, ताशा, लेझीम, दिंडी च्या गजरात शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातून भ्रमण करीत चामोर्शी रोड येथे ११ वाजता पोहचली व श्री साई च्या पादुका दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली.

या भक्तिमय सोहळ्या प्रसंगी प्रामुख्याने श्री साई चर्मपादुका अभिषेक, मध्यान महाआरती, महाप्रसाद, भजन संध्या, पालखी भजन सोहळा व प्रसिद्ध सुमधुर गायक व गायिका कार्तिकी गायकवाड तसेच कौस्तुभ गायकवाड, यांचा “एक श्याम साई के नाम” या भक्तिमय भजन संध्या स्वरनुभूती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या अभूतपूर्व व ऐतिहासिक मंगलमय सोहळ्यास हजारोंच्या संख्येने श्री साई भक्त उपस्थित होते.
दर्शनासाठी राजकीय नेत्याची हजेरी
!!
या दर्शन सोहळ्यातील रथयात्रेत आमदार विजय वडेट्टीवार हे सहभागी होते. साईबाबाच्या चर्मपादुकांचे स्वागत करून मंदिरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या साई भक्तांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. साई पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, प्रमोद पिपरे यांचे सह अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी दर्शन घेतले.
