५ ऑगस्ट पर्यंत रस्ता दुरुस्ती न केल्यास चक्काजाम आंदोलन
आझाद समाज पार्टी ने दिले कार्यकारी अभियंताना निवेदन

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,१ ऑगष्ट)
आरमोरी ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. आरमोरी-गडचिरोली या जवळपास ३५ किलोमीटर असलेल्या महामार्गावर साखरा, पोर्ला , देऊळगाव, ठाणेगाव अशा बऱ्याच गावाजवळ प्रचंड मोठे ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहतुकीला खड्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत.
खड्यांमुळे बरेच अपघात या ठिकाणी झाले असून अनेकांना प्राण गमवावे लागले. अनेक ठिकाणी गाड्या फसतात, आजारी लोकांना ने आण करण्यास अडथळा होतो.. हा जिल्ह्यातील प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरून सतत वाहने धावत असतात. मात्र, खड्ड्यांमुळे या मार्गाची मोठी दुरवस्था झाली असल्याने खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे हे कळायला मार्ग नाही.
पावसाळ्यापूर्वी सदर मार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे होते. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे रस्त्यावरून पाणीही वाहत असते. सदर मार्गावरील डांबर उखडून जात आहे. ठाणेगाव, वैरागड फाट्यापासून १०० मीटरवर रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. तसेच आरमोरी गाढवी नदी परिसरात सुद्धा मोठे खड्डे पडले आहेत. गडचिरोली नाक्याजवळ सुद्धा मोठ्या खड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे पुढील ५ तारखेच्या आत आरमोरी ते गडचिरोली या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आझाद समाज पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन केला जाईल असा इशारा आझाद समाज पार्टी चे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, सतीश दुर्गमवार यांनी दिला आहे.
