गडचिरोली : बाजारपेठ सजली बैलपोळ्याच्या साजाने

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१ सप्टेंबर)
शेतकऱ्यांचा बैलपोळा हा सण उद्या वर येऊन ठेपला आहे. त्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधव अगदी आनंदात व उत्साहात बैलपोळ्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. वर्षभर राब राबणाऱ्या आपल्या बैलसाथीदाराला पोळ्याच्या दिवशी योग्य प्रकारे मानसन्मान दिला जातो.बैलपोळा सणाच्या आदल्या दिवशी आपल्या खांद्यावर शेतकरी मालकांच्या संसाराचा काही प्रमाणात आयुष्यभर ओझं घेऊन चालणाऱ्या खांद्याची मळण नदीतील मानाच्या मूळाने,व पळसाच्या पाच पाणी डगळ्यांनी करून पूजा केली जाते.दोन-तीन दिवस त्यांना आराम देण्यात येतो.
पोळ्याच्या दिवशी सकाळीच चांगल्या प्रकारचा चारा देऊन नदी, विहीर किंवा तलावावर नेऊन बैलांना स्वच्छ आंघोळ घालण्यात येते त्यानंतर बैलांना सजविण्यात येते.त्याच्यासाठी वेगवेगळी सजवण्यासाठी साहित्य शेतकरी खरेदी करत असतात. त्यानिमित्ताने गडचिरोली शहरातील बाजारात दुकाने थाटले आहेत.आपल्या लाडक्या बैलांना सजवण्यासाठी सामान घेतांनाची शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे.आपल्या लेकराप्रमाणे मुक्या प्राण्यांना बैलांना जीव लावणारा शेतकरी आज कोणत्याही आर्थिक परिस्थितीत बैलांना सजवण्यासाठी सामान घेण्यासाठी तयार असतो.
बैलांच्या सजावटीसाठी बाजारपेठेत उपलब्ध सामान ¶¶¶ त्यामध्ये व्यसन,मोरख्या कासरा, हिंगोळ,पाठीवरील झुला, घुंगरमाळा,पायातील पैंजण,कवड्यांच्या माळा,बाशिंग, वेगवेगळ्या रंगाचे गोंडे,रंगीबेरंगी फुगे, वेगवेगळे रंग याचा समावेश आहे.
बैलांना सजवून गावामधून ढोल ताशांच्या वाद्यांमध्ये मिरवणूक काढले जाते.मानाच्या बैलाची मानाच्या लोकांकडून विधिवत पूजा केली जाते व आंब्याच्या पानाच्या बांधलेल्या तोरणा खालून बैलांना काढून मारुतीच्या मंदिराकडे जाऊन तेथे नारळ फोडण्यात येते.त्यानंतर घरोघरी बैलांना मिरवून बैलांची महिला पाय धुवून त्यांना गोड पदार्थ खायला देऊन व पूजा करतात.घरामध्येही कुंभारांनी बनवलेली मातीच्या बैलांची पूजा केली जाते.घराच्या दरवाजा जवळ व गोट्याजवळ उकीरड्यावर मेढ्या ठेवला जातो. जे लोक आपल्या मालकांची बैलपोळ्यामध्ये धरतात त्यांना पोळ्याच्या दिवशी बैल मालकांच्या घरी पुरणपोळीचे जेवण असते.
पोळ्याच्या सणानिमित्त आपल्या घरघड्याला नवीन कपडे शिवतात.हा सारा सोहळा फक्त ग्रामीण भागामध्येच अगदी आनंदात आणि उत्साहात पाहायला मिळतो.बदलत्या युगामध्ये यांत्रिक शेती पद्धत सुरू झाली,त्यामुळे बैल पाळणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी झाली तरी सुद्धा अजूनही हा बैल पोळा मानाचा सण ग्रामीण भागामध्ये तितक्याच उत्साहात शेतकरी बांधव साजरा करतात .
बाजारपेठेमध्ये दरवर्षीपेक्षा यावर्षी काही प्रमाणात साहित्य महाग झालेले आहे,तरीपण शेतकऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाही हे विशेष. युगान युगे चालत आलेली शेतकरी आणि बैल यांच्या नात्यातील सणाची परंपरा ग्रामीण भागातील शेतकरी राजा अजुनही चालू राहावी यासाठी धडपड करताना दिसत आहे.
