जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य जनतेला होणारा फायदाच- आमदार मिलिंद नरोटे यांचा विश्वास

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २१ सप्टेंबर)
भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज (दि. २१ सप्टेंबर) रोजी कर्तव्य कक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल. मागणी व उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबांच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सामान्य माणसाचे जीवनमान सुलभकरणे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबुती देणे हा जीएसटी करप्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल, असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते. केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकमताने संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पास बळ दिले आहे, अशा शब्दांत आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी या बदलाचे स्वागत केले.
सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम व लघु उद्योगक्षेत्र, मध्यमवर्गीय समाजघटक, महिला आणि युवावर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल. देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जीएसटी कररचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रीत उत्क्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान यामुळे उंचावणार आहे. सध्याच्या चार स्तरीय कर रचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ १८ टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरांत नवी जीएसटी कर आकारणी होणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे, असे ते म्हणाले.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, डॉ. नितीन कोडवते आदिवासी आघाडी, महामंत्री गीता हिंगे, रमेश भुरसे किसान मोर्चा, अनिल कुनघाडकर शहर अध्यक्ष, सुधाकर येनगंधलवार जिल्हा उपाध्यक्ष, सीमा कन्नमवार, अविनाश विश्रोजवार, विवेक नवघडे, नरेश हजारे, रमेश नैताम, देवाजी लाटकर, डॉ. प्रिया खोब्रागडे, अर्चना चन्नावार, वर्षा शेडमाके जिल्हा सचिव आदी उपस्थित होते.
