गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी लॉयड मेटल्सवर सोपवावी – सुरेश पद्मशाली

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१८ फेब्रुवारी)
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी लायड्स मेटल्सवर सोपवावी अशी सुचना सुरेश पद्मशाली यांनी केली आहे.सुरेश पद्मशाली यांनी प्रसिद्धी साठी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात नगर परिषदांना व ग्रामपंचायतींना जे जिल्हा निर्मिती च्या ४३ वर्षात जमले नाही ते लायड्स मेटल्स ने स्वखर्चाने गडचिरोली व इतर शहरात व गावात मुख्य मार्गावर वृक्षारोपण व कठडे लावून शहराचे सौंदर्यीकरण करून दाखविले. दुर्गम भागात मल्टीस्पेशालीटी दवाखाना व आधुनिक शाळा व बंद पडलेले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु केले उच्च शिक्षणासाठी गडचिरोली च्या विद्यार्थ्यांना आँस्ट्रेलीयात पाठविले, कर्मचारी यांना कंपनीचे शेअर्स दिले गरिबांसाठी आरोग्य व शिक्षणाची सोय केली.
लायड्स मेटल ला सन २०२५-२६ साठी २.६ कोटी टनाची लीज मिळाली. प्रति टन ६००० रूपये बाजार भावाने लायड्स मेटल ला १५ हजार ६०० कोटी रूपये मिळतील यातून शासनाला प्रती टन (१५% )९०० रूपये प्रमाणे २३४० कोटी रूपये रायल्टी प्राप्त होईल. खनीज उत्खनन व इतर उत्पादन खर्च अंदाजे १००० रूपये प्रति टन प्रमाणे २६०० कोटी खर्च येईल असा एकुण ६९४० कोटी खर्च जाऊन सुमारे ८००० कोटी चा नफा मिळण्याची शक्यता आहे.सन २०२६-२७ मध्ये लायड मेटल्सची लीज २.६ कोटी टनावरून ५ कोटी टनापर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कोनसरी प्रकल्पात लोखंडाची निर्मिती सुरु झाले आहे त्यातूनही कंपनी ला हजारो कोटी मिळतील. लायड्स मेटल्स चे मार्केट कँपीटल १५ फेब्रुवारी २०२६ ला ६४९०७ कोटी असल्याचे समजते जिल्ह्याच्या विकासासाठी लायड मेटल ४००-५०० कोटी सहज खर्च करू शकते.
गडचिरोली जिल्ह्याच्या वार्षिक योजनेपेक्षा लायड्स मेटल्स ची वार्षिक योजना फार मोठी आहे. लायड मेटल्सकडे प्रचंड पैशासोबत विकास दृष्टी असलेले एमडी बी.प्रभाकरन व मनुष्यबळ आहे.
लायड मेटल्स कडून खनीज निधी व सिएसआर निधी तून शेकडो कोटी रूपये शासनाला मिळाले परंतु त्याचा ही योग्य वापर झाला नाही मंजूर केलेली कामे रद्द करावी लागली. सुरजागड व अहेरी निर्वाचन क्षेत्रात रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागातील विद्वान अभियंत्यांनी गडचिरोली, चामोर्शी व इतर शहरातील रस्ते अरूंद करून नालीवरील फुटपाथ दुकानदाराला वापरण्यास मुभा दिल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. आता पर्यंत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला व त्यांना कोणतीही योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस अनेक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक विकास योजनांची अंमलबजावणी करीत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लायड मेटल चे एमडी बी प्रभाकर यांचेवर सोपविल्यास जो विकास जिल्हा निर्मिती च्या ४३ वर्षात झाला नाही तो येत्या ४-५ वर्षात होईल व गडचिरोली जिल्हा स्टील सिटीसोबत रेल्वे, रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन, पर्यटन व इतर क्षेत्रात प्रगती करेल असा विश्वास सुरेश पद्मशाली यांनी व्यक्त केला आहे.
